Wednesday, 31 August 2011

भेट

मी नेहमी प्रमाणे ट्रेन मध्ये पुस्तक वाचत होतो. ह्या वेळी जेफ्री आर्चर यांचे पुस्तक होते. त्यातीलच ही एक लघुकथा.

बगदाद शहरात एक व्यापारी राहत होता. एकदा त्याने आपल्या नोकराला बाजारात अन्न धान्य खरेदी करण्यासाठी  पाठवले. थोड्या वेळाने नोकर जो परत आला तो मुळी भीतीने थरथर कपताच ! तो व्यापारयाला म्हणाला - " धनी, मी बाजारात गेलो होतो, तेव्हा मला गर्दित एक स्त्रीचा धक्का लागला. मी मागे पाहिले तर ती साक्षात्  मृत्युदेवता होती. तिन माझ्याकडे पाहत धमकीवजा इशारा केला. धनी, तुम्ही तात्पुरता तुमचा घोडा मला दया. म्हणजे काही काळासाठी या गावापासून कुठेतरी दूर निघून जातो. शेजारच सामरा गाव आहे ना, तिथेच जावून राहीन मी. म्हणजे मी मृत्युच्या हाथी लागणार नाही." त्याचे ते शब्द ऐकताच व्यापारयाने तातडीने आपला घोडा त्या नोकराच्या स्वाधीन केला. त्याने लगाम खेचला आणि भरदाव वेगाने तो निघून गेला. त्यानंतर तो व्यापारी बाजारात गेला. तेव्हा त्याने गर्दित मृत्युदेवतेला उभे असलेले पाहिले. तो तिच्या जवळ जावून म्हणाला- " देवी, आज सकाळी माझ्या नोकराकडे पाहून तू धमकिचे अविर्भाव का केलेस? " .     तर ती म्हणाली ." त्या धमक्या नव्हत्या काही. !  अरे ते तर आश्चर्याचे भाव होते.त्याला इथे गावत पाहून मी चकित झाले होते. " व्यापारी म्हणाला ," पण का? "
मृत्युदेवता म्हणाली," मी विचार केला हा माणूस बगदाद मध्ये कसा? कारण आज रात्रीच मी त्याला सामरा गावत भेटणार आहे ना.!!!!

Monday, 25 July 2011

दृष्टीकोन

मी रविवारी ठाण्याला गेलो होतो. निघताना दुपार झाली. ठाणे स्टेशनवर आलो . सर्व स्लो ट्रेन लागल्या होत्या. इतक्यात घोषणा झाली कि गोरखपूर एक्स्प्रेस येतेय. म्हंटल जावूया विदाऊट एक्स्प्रेसने लवकर पोहचू. सहा नंबर वर आलो. जाणारे बहुतेक  उत्तरभारतीय होते . गाडी आली . गाडीला गर्दी होती. मी जनरल डब्या जवळ गेलो. पहिले तर दरवाजा आतून लावलेला होता. मी व एक उत्तर भारतीय बाहेरून आतील लोकांना दरवाजा उघडण्यासाठी ओरडू लागलो. दरवाजा उघडत नाही असे पाहून गर्दी पुढच्या दरवाजावर गेली. मी व तो उत्तर भारतीय तसेच थांबून दरवाजा उघडण्याची वाट पाहत होतो. इतक्यात कोणीतरी दरवाजा उघडला. आम्ही पटकन आत गेलो. आत जाताच त्या उत्तर भारतीयाने पटकन आतून दर लावून घेतले. व म्हणाला " साले अंदर आयेंगे तो जगह  नाही होगी". थोड्या वेळापूर्वी आम्ही दरवाजा उघडण्यासाठी आटापिटा करत होतो. आत येताच मात्र आम्ही आतले झालो होतो. जागा बदलली कि दृष्टीकोन लगेच बदलतो.
मी एकदा व्यवस्थापनाच्या  व्याख्यानाला गेलो होतो. त्यावेळी एक गोष्ट सांगितली होती. एका बेकरीत एक कामगार होता. तो नेहमी आपल्या मालकाला नावे ठेवायचा. म्हणायचं कि आपला मालक आपल्याला योग्य मोबदला देत नाही. मालकाच्या  ते  कानावर  गेले  हा सर्व कामगारांना भडकावत आहे.  त्याने त्याला बोलावले आणि सरळ  वरच्या जागेवर बढती दिली. बढती मिळताच त्याने प्रथम इतर  कामगारांचे पगार कमी केले व कारण दिले कि हे कामगार काम न करताच फक्त गप्पा गोष्टी करतात. जागा बदलाच दृष्टीकोन बदलतो. काय !!!!

Tuesday, 3 May 2011

विरोधाभास

आत्महत्या खून आजकाल खूप सामान्य गोष्टी झाल्या आहेत.एखाद्याचा मृत्यू झाला म्हणजे विशेष गोष्ट राहिली नाही.
        माझ्या मित्राचे एक मित्र रेल्वे मध्ये vigillance ऑफिसर आहेत. त्यांच्या घरी एकदा गेलो होतो. ते टीसी बद्दल एक एक किस्से सांगत होते. ते म्हणाले कि टीसी आजकाल खूप भ्रष्ट झाले आहेत. आज जनरल डब्यात लोकांना दोघांचा  खूप त्रास होतो, हिजड्यांचा आणि टीसी चा. हि तुलना खरे म्हणजे खूप बोलकी आहे.  सांगता सांगता त्यांनी सांगितले कि मागच्या महिन्यात एका टीसी ला पंधरा लाखाच्या हेराफेरी बद्दल पकडले. तर त्या टीसी ने आत्महत्या केली.  माझा मित्र म्हणाला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. त्याच्या आत्महत्येचे आम्हाला विशेष काही वाटले नाही. चोर होता साला.!!!!.मी म्हणालो फक्त पंधरा लाखाबद्दल आत्महत्या. माझ्या लेखी पंधरा लाख हि हेराफेरीची खूप कमी किंमत होती. thanks to our corrupt ministers !!!.
       तेव्हा ते म्हणाले तो टीसी एका महिन्या नंतर रिटायर होणार होता. त्याला vigillance  ने पकडल्यामुळे त्याचे सर्व फंड, पगार थांबवले जाणार होते. जवळपास तीस लाखाचे नुकसान होणार होते. आता त्याने आत्महत्या केल्यामुळे ते सर्व पैसे रेल्वेला त्याच्या मुलांना देणे भाग होते. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्याने आत्महत्या केली. आता मात्र आम्ही अंतर्मुख झालो. आत्महत्या करणे.जीव देणे म्हणजे काय यातील भयानकता आम्हाला जाणवली. अक्षरश: आपले आयुष्ये संपवणे म्हणजे किती टोकाची भूमिका आहे. आपल्या लोकांच्या भावनाच बोथट झाल्या आहेत. त्या टीसी ने आपले सर्वस्व आपल्या मुलासाठी पणाला लावले. आम्हाला त्याचा त्याग खूप महान वाटायला लागला. थोड्याच वेळापूर्वी त्याचा मृत्यू तुच्छ वाटत होता. खरच किती विरोधाभास आहे.

Monday, 25 April 2011

पण त्याचे काय?

मी आज कर्जत ला गेलो होतो. म्हणतात  प्रवासात पंडित मैत्री होते पण मला वाटते कि मानवी स्वभावाची विविध वैशिष्ट्ये, एकाच वेळी क्वचितच कुठे सापडत असतील. असेच दोन  अनुभव मला आज आले . कदाचित योगा  योग असेल.
             मी सकाळी कल्याण स्टेशन वर होतो. प्लेटफोर्म नंबर ४ वर टोकाला उभा होतो. कोयना एक्स्प्रेस आली. सर्वजण घाई घाईत चढत होते. माझ्या समोर जनरल डब्बा होता. गाडी सुटायची वेळ झाली होती.तेव्हा लांबून एक कुटुंब घाईने येत होते. त्यामध्ये एक म्हातारा, एक स्त्री व एक मुलगा होता. गाडी ने भोंगा वाजवून सुटण्याचा इशारा दिला. लोकांनी म्हातारा माणूस पाहून गार्ड ला थोडे थांबण्याची विनंती केली. गार्ड ने त्यांच्या कडे पहिले व म्हणाला कि नाही थांबू शकत. असे सगळ्यासाठी थांबलो तर गाडी लेट होईल. गाडी सुरु झाली. ते कुटुंब डब्या जवळ आले. गाडी सुरु असतानाच ती स्त्री आत चढली. नंतर तिने व मुलाने त्या म्हातारया गृहस्था ला वर चढवू लागले. गाडी ने वेग पकडला होता. म्हातारा गृहस्थ जवळ जवळ पडणारच होता. पण मुलाने सावरले. व तिघे जण चढले एकदाचे . सर्व पब्लिक खाली ओरडत  होती. काही जण म्हणत होते कि हि अशी लोकं वेळेवर येत नाहीत. मग धडपडतात, पडतात किंवा मरतात आणि गाडी लेट होते.  मी मनात म्हणालो कि त्या गार्ड ने गाडी थोडा वेळ थांबविली असती तर.?....
             दुपारी मी कर्जत वरून कल्याणला यायला निघालो. स्टेशन वर उभा होतो. लोकल यायला वेळ होता.  इतक्यात vishakha pattanam एक्स्प्रेस आली. थांबली व वेळेनुसार निघाली. गाडी निघाली व लगेच थांबली. थोडा वेळ गेला. लोकांना वाटले सिग्नल लागला असेल. पण अशीच दहा मिनिटे गेली . मग कुणीतरी म्हणाले एसी डब्यातील लोकांनी चैन खेचली आहे . मी जिथे घोळका दिसत होता तिथे गेलो. तिथे एक अर्धी प्यांट घातलेला गुजराती रेल्वे कर्मच्यारांशी वाद घालत होता. थोड्या वेळाने कळले कि त्यांच्या गाडीतील अर्धा एसी बंद होता. रेल्वे कर्मचारी सांगत होते कि लोणावळ्याला एसी मेक्यानिक आहे तो दुरुस्त करेल. पण डब्यातील लोकं ऐकायला तयार नव्हती. म्हणत होती. त्या मेक्यानिकला इथे बोलवा. जो पर्यंत एसी ठीक होणार नाही तो पर्यंत गाडी पुढे जावू देणार नाही. शेवटी स्टेशन मास्तर आले. त्यांनी माफी मागितली. तर हि गुजराती मंडळी म्हणाली नाही, आम्हाला तसे लिहून द्या.शेवटी स्टेशन मास्तरांनी लिहून दिले व गाडी सुटली.गाडी पस्तीस मिनिटे लेट झाली होती. गाडी गेल्यावर खालची लोकं म्हणू लागली बरोबर होते त्या लोकांचे. इतके पैसे देऊन एसी नाही चालू तर काय उपयोग. मी आपला मनात म्हणालो पण गाडी लेट झाली त्याचे काय?.........
    मी सोबत वरील प्रसंगाचा video  जोडला आहे

Tuesday, 19 April 2011

आई तुझा आर्शिवाद (आशीर्वाद )

"आई तुझा आर्शिवाद". आर्शिवाद शब्द चुकीचा लिहिला आहे. परंतु त्याची इतकी सवय झालेय कि तोच शब्द बरोबर आहे असे वाटू लागलंय. निदान ४० टक्के रिक्षांच्या मागे हेच लिहिलेले असते. ना लिहिणाऱ्याला काही वाटत ना बघणाऱ्याला. परंतु मुद्दा हा आहे कि लोकांना खरंच मराठी बद्दल आस्था आहे का.? कोणी म्हणेल कि हे म्हणजे सुता वरून स्वर्ग गाठ्ण्यासारखे आहे. परंतु मराठी हि राज्य भाषा आहे. व लोक मराठी विषयी किती जागृत आहेत हे दाखवण्यासाठी हे पुरेसे आहे.  ह्या अशा चुका  राजकीय पुढाऱ्यांच्या ब्यानरवर सर्रास दिसतात. पुन्हा हीच लोकं मराठीचा कैवार घेतल्याप्रमाणे भाषणे ठोकतात. आता मराठीत बोलायला हवं याची विलक्षण जागृती झालेली आहे. मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होत चालला आहे .मी असाच एकदा ट्रेनने बोरीवली हून दादरला येत होतो. ट्रेनचा अर्धा डबा फर्स्ट क्लास व अर्धा सेकंड क्लास होता. मध्ये फक्त स्टीलच्या रॉड चे पार्टिशन होते. मी गर्दी असल्यामुळे उभा राहून प्रवास करत होतो. फर्स्ट क्लास खाली होता. फक्त काही लोकं होती. अचानक फर्स्ट क्लास मध्ये भांडण सुरु झाले. एक चाळीशीचा गुजराथी हिंदी मध्ये एका म्हाताऱ्या साधारण पणे साठीच्या गृहस्थाशी भांडत होता. आवाज वाढू लागला. सेकंड क्लास मधले प्रवाशी सुधा ओरडू लागले. म्हणू लागले इतनी जगह है फिर भी झगडा करते है. अचानक साठीचा गृहस्थ मराठीत काहीतरी बोलला. झाले आमच्या डब्यातील मराठी लोकं उठून उभी राहिली. एका म्हतातारा माणूस.तोही मराठी. आणि भांडणारा गुजराथी. नुकत्याच राज ठाकरे यांच्या वादळी सभा झाल्या होत्या. सर्व इकडचे मराठी त्या गुजरात्याला शिव्या घालू लागले. दोघे तिघे म्हणाले कि नेक्स्ट स्टेशन पे हम वहा आते है . त्या गुजरात्याने आयुष्यात कधी इतक्या शिव्या खाल्ल्या नसतील. मलाही हे सर्व पाहून कुठे तरी अस्मिता जागृत झाल्या सारखे वाटले.
       असो. सांगायचा मुद्दा हा कि न्यूनगंड तर गेला. परंतु पुढे काय ? खरंच मराठी बोलाल्या मुळे सर्व समस्या सुटतील.  मराठी शाळांचे प्रमाण घटत चालले आहे. त्याच बरोबर इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोर आता पासूनच प्रवेशा साठी लांब लांब रांगा लागत आहेत. त्या मध्ये मराठी सुशिक्षित लोकंच जास्त आहेत. मग काय मुल शिकतील इंग्रजी माध्यमातून. मोठी होतील आणि म्हणतील "आई तुझा आर्शिवाद".

Monday, 11 April 2011

अश्या एक एक वल्ली

मला रोजच्या प्रवासात काही न काही  नेहमी वाचण्यासाठी लागतेच. आज मी शिरीष कणेकरांचे "सूरपारंब्या" वाचत होतो. त्यातील एक किस्सा . लोक किती विक्षिप्त असतात त्याचा नमुना. त्यांच्याच  शब्दात.
".......माझे एक परांजपे नावाचे एक मित्र आहेत. त्यांचा एका मित्राला शिस्तीचे भारी वेड. रोज सकाळी ऑफिसला जाताना ते बायकोकडे जेवण्याच्या मेनुची लिस्ट द्यायचे. त्यांना जेवताना सर्व पदार्थ लिस्ट प्रमाणे हवे असायचे. एखादा पदार्थ नसेल तर ते सकाळीच सांगायचे. मग ते पर्यायी पदार्थ सुचवीत.उदा. लिंबाचे लोणचे सांगितले आणि नसेल तर ते आंब्याचे सांगायचे. पण एकदा लिस्ट फायनल झाली म्हणजे झाली. जेवताना ते लिस्ट घेवून एका एका पदार्था वर टिक करायचे.  जर पदार्थ लिस्ट प्रमाणे नसेल तर ते पानावरून उठायचे.
         एकदा ते जेवताना फारच अस्वस्थ दिसत होते. बायको काळजीत पडली. पदार्थ तर लिस्ट प्रमाणे सर्व होते. नंतर थोड्या वेळाने ते बायकोला म्हणाले" तुझ्या ताटातले केळे घेवू का ?. " बायको म्हणाली, " घ्या ना. विचारायचे  ते काय ?".  त्यांनी आनंदाने केळे घेतले.
      दुसऱ्या दिवशी त्यांनी लिस्ट मध्ये केळे टाकले होते. बायकोला वाटले स्वारीची  केळे खायची इच्छा दिसते.  दुपारी स्वारी जेवायला बसली. ताटातले केळे उचलले. बायकोला दिले व म्हणाले." कालचे घेतलेले केळे परत."
            पुढे त्या नवरा बायकोचे काय झाले माहित नाही. बहुधा बायकोने नवऱ्यावर   भाडोत्री मारेकरी घातले असतील .

Saturday, 9 April 2011

"ती "

कालचा तो एक नेहमीचा दिवस होता. मी लातूर एक्स्प्रेस ने कल्याणला जात होतो. माझ्या समोर एक सुंदर तरुण मुलगी बसली होती. फोनवर ती बोलत होती. मी तिच्याकडे पाहीले. ती बोलत होती. मधूनच हसत होती. बहुदा फोनवर "तो" असावा. गाडी पुढे जात होती. एक एक स्टेशन मागे जात होते. तिचे बोलणे चालूच होते. मलामात्र अस्वस्थ वाटू लागले. मधून मधून तिच्याकडे पाहू लागलो. तिला ते कळले असावे.ती थोडी सावध झाली. पुढे ठाणे आले. पारसिकचा बोगदा गेला. मी मात्र अजून अस्वस्थ झालो. तिचे आपले बोलणे चालूच होते. मीही तिच्याकडे पाहत होतो. मी पाहतोय हे पाहून ती थोडी अस्वस्थ झाल्यासारखी वाटली. मला मात्र आता तिच्याशी बोलायचेच होते. कल्याण जवळ येत होते. मी बोलण्याचा पवित्रा घेवून तिच्या जवळ गेलो. ती घाबरून उभी राहिली. कल्याण स्टेशन आले. ती पटकन उतरली. मीही तिच्या मागे गेलो. आणि तिच्या जवळ जावून विचारले,"excuse me . ती त्रासून म्हणाली "काय आहे? " मी म्हणालो, तुम्ही कोणत्या नेटवर्क चे कार्ड वापरता. मला सांगाल  का?. माझे नेटवर्क ट्रेनमध्ये अजिबात चालत नाही."