Tuesday 19 April 2011

आई तुझा आर्शिवाद (आशीर्वाद )

"आई तुझा आर्शिवाद". आर्शिवाद शब्द चुकीचा लिहिला आहे. परंतु त्याची इतकी सवय झालेय कि तोच शब्द बरोबर आहे असे वाटू लागलंय. निदान ४० टक्के रिक्षांच्या मागे हेच लिहिलेले असते. ना लिहिणाऱ्याला काही वाटत ना बघणाऱ्याला. परंतु मुद्दा हा आहे कि लोकांना खरंच मराठी बद्दल आस्था आहे का.? कोणी म्हणेल कि हे म्हणजे सुता वरून स्वर्ग गाठ्ण्यासारखे आहे. परंतु मराठी हि राज्य भाषा आहे. व लोक मराठी विषयी किती जागृत आहेत हे दाखवण्यासाठी हे पुरेसे आहे.  ह्या अशा चुका  राजकीय पुढाऱ्यांच्या ब्यानरवर सर्रास दिसतात. पुन्हा हीच लोकं मराठीचा कैवार घेतल्याप्रमाणे भाषणे ठोकतात. आता मराठीत बोलायला हवं याची विलक्षण जागृती झालेली आहे. मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होत चालला आहे .मी असाच एकदा ट्रेनने बोरीवली हून दादरला येत होतो. ट्रेनचा अर्धा डबा फर्स्ट क्लास व अर्धा सेकंड क्लास होता. मध्ये फक्त स्टीलच्या रॉड चे पार्टिशन होते. मी गर्दी असल्यामुळे उभा राहून प्रवास करत होतो. फर्स्ट क्लास खाली होता. फक्त काही लोकं होती. अचानक फर्स्ट क्लास मध्ये भांडण सुरु झाले. एक चाळीशीचा गुजराथी हिंदी मध्ये एका म्हाताऱ्या साधारण पणे साठीच्या गृहस्थाशी भांडत होता. आवाज वाढू लागला. सेकंड क्लास मधले प्रवाशी सुधा ओरडू लागले. म्हणू लागले इतनी जगह है फिर भी झगडा करते है. अचानक साठीचा गृहस्थ मराठीत काहीतरी बोलला. झाले आमच्या डब्यातील मराठी लोकं उठून उभी राहिली. एका म्हतातारा माणूस.तोही मराठी. आणि भांडणारा गुजराथी. नुकत्याच राज ठाकरे यांच्या वादळी सभा झाल्या होत्या. सर्व इकडचे मराठी त्या गुजरात्याला शिव्या घालू लागले. दोघे तिघे म्हणाले कि नेक्स्ट स्टेशन पे हम वहा आते है . त्या गुजरात्याने आयुष्यात कधी इतक्या शिव्या खाल्ल्या नसतील. मलाही हे सर्व पाहून कुठे तरी अस्मिता जागृत झाल्या सारखे वाटले.
       असो. सांगायचा मुद्दा हा कि न्यूनगंड तर गेला. परंतु पुढे काय ? खरंच मराठी बोलाल्या मुळे सर्व समस्या सुटतील.  मराठी शाळांचे प्रमाण घटत चालले आहे. त्याच बरोबर इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोर आता पासूनच प्रवेशा साठी लांब लांब रांगा लागत आहेत. त्या मध्ये मराठी सुशिक्षित लोकंच जास्त आहेत. मग काय मुल शिकतील इंग्रजी माध्यमातून. मोठी होतील आणि म्हणतील "आई तुझा आर्शिवाद".

No comments:

Post a Comment